गुप्तचर अधिकार्‍याला पत्नी, मुलांसमोरच घातल्या गोळ्या   

पहलगाम येथील हल्ल्यात हैदराबादमध्ये गुप्तचर विभागात काम करणार्‍या मनीष रंजन यांचाही मृत्यू झाला. मनीष रंजन हे मूळचे बिहारचे होते. पत्नी जया मिश्रा, १२ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांच्या मुलीसोबत ते जम्मू आणि काश्मीरला फिरायला गेले होते. 
 
पहलगामच्या मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळख असलेल्या गवताळ कुरणाजवळ कुटुंबीयांसमवेत पर्यटनाचा आनंद घेत असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. मनीष रंजन यांना पत्नी आणि मुलांसमोरच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या.  त्याचवेळी मनीष रंजन यांनी पत्नी आणि मुलांना विरुद्ध दिशेने पळायला सांगून त्यांचा जीव वाचवला. मात्र, हल्ल्यामुळे ते भयभीत झाले आहेत. 
 
मनीष बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील अरुही गावाचे रहिवासी होते. सासाराम शहरातील गौरक्षणी भागात त्यांचे घर आहे. मनीष रंजन आणि जया मिश्रा २०१० मध्ये झारखंडच्या रांची येथे विवाहबद्ध झाले होते. रांचीमध्ये आयबीमध्ये काम केल्यानंतर त्यांची दोन वर्षांपूर्वी हैदराबाद येथे नियुक्ती झाली होती. मनीष तिघा भावांमध्ये सर्वात मोठे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे भाऊ राहुल रंजन आणि विनीत रंजन दोघेही बेशुद्ध पडले. त्यांचे वडील मंगलेश मिश्रा पश्चिम बंगालच्या पुरूलिया जिल्ह्यातील झालदा येथे एका शिक्षक होते, ते आता  सेवानिवृत्त झाले आहेत. दरम्यान, मनीष रंजन यांच्या हत्येनंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जम्मू आणि काश्मीरच्या हल्ल्यासंदर्भात दुःख व्यक्त केले. या भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
 

Related Articles